Ad will apear here
Next
आली दिवाळी दिवाळी...
दिवाळीच्या विविधरंगी भावभावनांनी नटलेल्या गाण्यांपैकी एक गाणं आज धनत्रयोदशीच्या दिवशी हमखास आठवतं ते म्हणजे बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेलं नि माणिक वर्मा यांच्या स्वरांतलं ‘आली दिवाळी दिवाळी’.... ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद...
........
आकाशवाणीतील पहाटेच्या प्रसारण ड्युटीसाठी निघताना वाटेतल्या विठ्ठल मंदिरातील टाळ-मृदंगाचा गजर आणि काकड आरतीचा समूहस्वर ऐकला की अवघी पहाट आणखीनच प्रसन्न होते. आश्विनातली ती पहाट दिवाळीच्या आनंदक्षणांची साक्ष होणारी असते. मिणमिणत्या पणत्यांच्या ज्योती विझू न देता पहाटवारा अंगावर घेत दिवाळी येते. प्रत्येकाच्या घराघरात आणि खरं म्हणजे रसिकजनांच्या मनाच्या अंगणात अनेक स्मृतींच्या रांगोळ्या घालत ती येते. 
मनात साठवलेल्या कितीतरी आठवणींची गाणी गात गात दिवाळी येते. दिवाळीबरोबर स्वरलहरींवरून ही गाणी घराघरात पोहोचवते आपली प्रिय आकाशवाणी! वर्षानुवर्षांची परंपरा आकाशवाणी जपते आणि दिवाळीची गाणी रसिकश्रोते जिवाचा कान करून आजही तितक्याच तन्मयतेने ऐकत असतात... दिवाळीच्या विविधरंगी भावभावनांनी नटलेल्या गाण्यांपैकी एक गाणं आज धनत्रयोदशीच्या दिवशी हमखास आठवतं ते म्हणजे

लाविते मी निरांजन, तुळशीच्या पायापाशी।
भाग्य घेऊनिया आली, आज धनत्रयोदशी।। 

विदुषी माणिक वर्मा यांच्या सोज्वळ सुरांमधून हे गीत ऐकलं की खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते. मराठी माणसाला दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळी अंकांची जशी गोडी असते, तशीच मराठी नाटकांचीही! मराठी माणूस जुन्या-नव्या नाटकांच्या प्रेमात पडतोच आणि नाटकांबद्दलच्या चर्चेत हिरीरीने भाग घेता घेता ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या नाटकाच्या आठवणीत स्वत: हरवून जातो. ताई, भाऊ आणि बाबा या भूमिकांबद्दल किती बोलू आणि किती नको असं त्याला होऊन जातं. बोलता बोलता तो बोलत राहतो बाळ कोल्हटकरांच्या शब्दसामर्थ्याबद्दल आणि संगीतरचनांबद्दल. ताईची भूमिका करणाऱ्या सात्त्विक व्यक्तिमत्त्वाच्या आशा काळे यांच्याबद्दल तर मराठी माणसाला किती जिव्हाळा वाटतो यावर तर बोलायलाच नको. कारण प्रत्येक भाऊ आशा काळे यांच्या व्यक्तिमत्त्वात आपल्या बहिणीला शोधत असतो. ताई असावी तर अशी! किंवा ‘अरेच्चा, ही तर माझी ताईच!... डिट्टो माझी ताईच...’ अशीच प्रेमळ, स्नेहार्द्र नजरेची त्यागमूर्ती माझी ताई! आशा काळेसुद्धा त्यांच्या ‘ताई’च्या भूमिकेबद्दल भरभरून बोलतात. अभिनय क्षेत्रात त्यांना स्वत:ची एक खास ओळख करून देणारी भूमिका ताईचीच! 
आम्ही आकाशवाणीवरून माणिकताईंचं हे गाणं जेव्हा श्रोत्यांना ऐकवत असतो, तेव्हा मन:चक्षूंपुढे ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’मधली ताई साक्षात उभी राहते. सुंदर, सुबक तुळशीवृंदावन आणि निरांजन लावणारी ताई... ज्योतीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर उजळलेला आणि धनत्रयोदशीचा सण भाग्य घेऊन आलेला... तुळशीपुढे दिवा लावताना माणिकताईंचा स्वर कानाला सुखावत असतो. त्याबरोबरच संतसाहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत पाठक यांच्या लेखातल्या काही ओळी आवर्जून आठवतात. किती सुंदर लिहिलय बघा पाठकसरांनी... ‘पणती तुळशी वृंदावनापाशी लावली की सासुरवास उजळतो नि तो अनेक साठा उत्तरांच्या कहाण्या सुफळ संपूर्ण करतो. तुळस हीच सासुरवाशिणीची प्रिय सखी असते. तिच्यापाशी मन मोकळं करून ती पुन्हा सासुरवास झेलायला ताजीतवानी होते. माहेरवाशीण तुळशीपाशी बसली, की बालपणाच्या आठवणी तिच्या पापण्यांच्या अंगणात उडायला लागतात. ती त्या अधीरपणे गोळा करू पाहते.’

घरोघरी जागविते, माय मुले झोपलेली।। 
घरोघरी दीप ज्योती, वरसाचा मोठा सण।
क्षणोक्षणी होते, आई तुझी आठवण।।

दिवाळी आल्यावर बालपणीच्या आठवणी येतातच. बाळ कोल्हटकरांनी लिहिलेल्या या ओव्या स्त्रीमनावर कोरल्या गेल्या आहेत. मूळ नाटकात आशा काळे या ओव्या स्वत: गात. पुढे माणिक वर्मा यांच्या आवाजात ध्वनिमुद्रिका निघाली. ही ध्वनिमुद्रिका आकाशवाणीच्या सांगीतिक वाटचालीतली ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. कित्येक पिढ्या या  स्वरलहरींवर डोलत राहिल्या. स्त्रीमनाची हळवी स्पंदनं बाळ कोल्हटकर यांनी या ओवीबद्ध कवितेतून व्यक्त केली. पुढे ती स्वरबद्ध करून माणिकताईंच्या गोड गळ्यातून घराघरात पोहोचवली. किती प्रासादिक ओव्या आहेत या बघा, आईच्या आठवणी जागवणाऱ्या, ज्यांची आई देवाघरी गेली त्यांच्या नयनांना अश्रूंचा पूर आणणाऱ्या...

चार वरसांमागे होता, हात तुझा अंगावरी।
कधी नाही जाणवली, हिवाळ्याची शिरशिरी।।
आज झोंबतो अंगाला, पहाटेचा थंड वारा।
कुठे मिळेल का आई, तुझ्या मायेचा उबारा।।

दिवाळी आलीय, दर वर्षीप्रमाणे येणार... पण आता आई नसणार... तिचा मायेचा उबदार हात आता अंगावर फिरणार नाही. आता हिवाळ्याची गोड शिरशिरी नाही, तर फक्त आठवणींच्या सरी, डोळ्यातून वाहणाऱ्या...

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते।
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते।।
सासरीच्या या संसारी माहेराची आठवण।
आठवती बाबा भाऊ आणि दारीचे अंगण।।
अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी।
दारी घालिते रांगोळी, माझ्यावाचून का कोणी।।

अशी आठवणींची रांगोळी घेऊन येते ही कविता. आई नाही या कल्पनेनं शहारते; पण बाळपणींच्या दिवाळीच्या आठवणींनी मोहरतेसुद्धा! ऐन दिवाळीत माणिकताईंसारखी स्वरलक्ष्मी हा इहलोक सोडून गेली. त्या वेळी दिवाळीतल्या दिव्यांमधला प्रकाश क्षीण झाल्याचा अनुभव आपण घेतला होता; पण आता हा प्रकाश पुन्हा नव्या उमेदीनं उजळत ठेवलाय तो त्यांच्या अजरामर स्वरांनी! बाळ कोल्हटकर यांच्या शब्द-स्वरांच्या सामर्थ्याने!! आज धनत्रयोदशीच्या दिवशी अंगणातल्या तुळशी वृंदावनापुढे दिवा लावताना, दिवसातल्या तिसऱ्या प्रहरातल्या पिलू रागाचे स्वर दिवाळीचा आनंद देतील. माणिकताईंच्या स्वरांचं ऐश्वर्य आणि नाट्यसंगीताचं वैभव न्याहाळताना, साक्षात दीपलक्ष्मीच तुमच्या-आमच्या घरात सदिच्छांचं दान घेऊन येईल आणि गात राहील...

लाविते मी निरांजन, तुळशीच्या पायापाशी।
भाग्य घेऊनिया आली, आज धनत्रयोदशी।।
आली दिवाळी दिवाळी...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZVDBH
 बाळ कोल्हटकरांचे
हे विक्रमी नाटक प्रेक्षक वारंवार पाहत ते आशा काळे यांचा या गाण्याचे वेळचा अभिनय व माणिकताईंचा मधाळ आवाज ऐकायला!
ताई, भाऊ, बाबा(जोगळेकर)यांनी नाटकाला खूप उंच नेऊन ठेवलेतो अनुभव केवळ अविस्मरणीय2
Similar Posts
प्रभू सोमनाथा... ‘प्रभू सोमनाथा’ हे भक्तिगीत आणि महाशिवरात्र असं एक समीकरणच होऊन गेलंय. ‘विजयपताका श्रीरामाची’ हे गाणं ऐकल्याशिवाय गुढीपाडवा साजरा झाल्यासारखा वाटत नाही, तसंच ‘प्रभू सोमनाथा’ या गाण्याचं आहे. म्हणूनच आज, महाशिवरात्रीच्या औचित्याने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आनंद घेऊ या ‘प्रभू सोमनाथा’ या जगदीश खेबूडकर यांच्या रचनेचा
हसले मनी चांदणे... भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, ख्याल, ठुमरी... असे गाण्याचे कितीतरी प्रकार माणिकताईंच्या स्वरांनी सजलेले आहेत. आज, १६ मे, माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात माणिक वर्मा यांनी गायलेल्या ‘हसले मनी चांदणे...’ या गीताबद्दल
आखाजीचा मोलाचा सन देखा जी.... आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा
अजून त्या झुडुपांच्या मागे... कविवर्य वसंत बापट यांचा २५ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ या त्यांच्या कवितेबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language